येस न्युज मराठी नेटवर्क : सरकार आणण्यात शरद पवार यांचा चमत्कार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४३ व्या वार्षिक सर्व साधारण सभा आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी यावेळी पुरस्कार मिळवणाऱ्या शेतकऱ्यांचं कौतुक करताना तुम्ही ज्याप्रमाणे कमी जागेत जास्त पीक घेतलं, त्याप्रमाणे शरद पवारांसोबत आम्ही कमीत कमी आमदारांमध्ये सरकार स्थापन करण्याचा चमत्कार करुन दाखवला असल्याचं म्हटलं. “जागा जास्त आहे, आमचंच पीक येणार असं कोणी आता म्हणू शकत नाही. आम्ही कमी जागांमध्ये तुमच्यावर मात करु शकतो हे दाखवून दिलं आहे,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपाला लगावला.
- शेतकऱ्याच्या आयुष्याचं चिपाड होता कामा नये
“सहकार क्षेत्र आणि राजकारण वेगळं केलं जाऊ शकत नाही. कारण अनेक राजकीय नेत्यांनी सहकार क्षेत्र मजबूत केलं आहे. साखर कारखानदारी आणि साखर क्षेत्राने अनेक नेते दिले आहेत,” असं यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हटलं. उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना लहानपणी ऊसाचा रस पिण्यासाठी मिळायचा याची आठवण सांगितली. “आम्ही शाळेत जायचो तेव्हा रस्त्यावर ठिकठिकाणी ऊसाचा रस पिण्यासाठी मिळायचा. ऊसाची गुऱ्हाळं नाक्यावर असायची. ऊनात गार ऊसाचा रस पिऊन बरं वाटायचं. पण गुऱ्हाळात एका बाजूने गेलेला रसरशीत ऊस दुसऱ्या बाजूने चिपाड होऊन बाहेर पडतोय याकडे आमचं लक्ष नसायचं. आज ग्रामीण अर्थव्यवस्था शेतकऱ्यावर अवलंबून आहे. दुसऱ्याच्या आयुष्यात गोडवा वाटत असताना शेतकऱ्याच्या आयुष्याचं चिपाड होत आहे. जर आम्ही राज्यकर्त्यांनी याकडे लक्ष दिलं नाही तर या कार्यक्रमाला काही अर्थ नाही,”