कोरेगाव भीमा येथे आज (बुधवारी) १ जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून कडेकोट नियोजन करण्यात आले आहे. हा अभिवादन सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने; तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे.
दर वर्षी १ जानेवारीला विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. यासाठी लोणीकंद शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासाठी अपर १० पोलिस अधीक्षक, ३२ पोलिस उपनिरीक्षक, १२१ पोलिस निरीक्षक, ३०८ सहायक पोलिस निरीक्षक, यांच्यासह पाच हजार पोलिस कर्मचारी, १२ सीआरपीएफ कंपन्या, १२०० होमगार्ड, १४ बीडीडीएस पथके; तसेच पोलिस स्वयंसेवक व समता दलाचे स्वयंसेवक मिळून सुमारे १० हजार पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी एकूण ७४० जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे; तसेच या काळात सोशल मीडियावरही पोलिसांचे लक्ष असेल. कोणत्याही प्रकारच्या जातीय भावना दुखावणे, आक्षेपार्ह पोस्ट, अफवा पसरविण्याऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेतदेखील पोलिसांनी दिले आहेत. २५० पेक्षा अधिक व्हॉट्स अॅप ग्रुपच्या अॅडमिनला यापूर्वीच नोटीस बजाविण्यात आली असल्याचे पोलिस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.