सोलापूर : दि लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँक सेवक सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नववर्ष व्याख्यानमाला २०२० आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष संजय एकबोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दि लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँक सेवक सांस्कृतिक मंडळाची स्थापना जून २००२ मध्ये झाली. यानंतर ट्रस्टच्या पहिल्याच सभेत गणेशोत्सवाव्यतिरिक्त व्याख्यानामालाही सुरू करावी अशी संकल्पना पुढे आली. गणोशोत्सव मंडळाच्या माध्यमातून बरीच वर्षे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम केले जात होते. मात्र ट्रस्टची निर्मिती करून व्यापक कार्यक्रम करण्याचे ठरले. २००३ पासून गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी सांस्कृतिक मंडळाकडून निवडण्यांत येवू लागले. कार्यक्रम सांस्कृतिक मंडळाच्या अधिपत्याखाली चालू झाले.
सोलापूर शहर हे पूर्वी गिरणगांव म्हणून ओळखले जात असे. येथील समस्या इतर शहरांच्या मानाने वेगळ्या आहेत. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून उदयोन्मुख शहर म्हणून सोलापूरची नव्याने ओळख होत आहे. या नगरीचे समाजमनही प्रगल्भ व्हावे यासाठी सातत्य राखत गेल्या १७ वर्षांपासून नववर्ष व्याख्यानमालेची ही ज्ञानज्योत अखंड तेवत ठेवली आहे. असंख्य हितचिंतक, कार्यकर्ते, प्रतिभावान वक्ते, अभिरूचीसंपन्न, उत्साही श्रोते यांच्या सहकार्याने ही व्याख्यानमाला आपले जीवन उजळत राहील असा विश्वास वाटतो. सोबतच्या कार्यक्रम पत्रिकेतील विषय पाहता सर्व स्तरातील लोकांसाठी वेग-वेगळया विषयांवर करमणुकीची मेजवानी मिळणार आहे हे निश्चित.