20 विद्यापीठांचे साडे तीन हजार खेळाडू दाखल
संचार प्रतिनिधी
सोलापूर, दि.25- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्या (गुरुवारी) पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय तेविसावी आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या महोत्सवासाठी राज्यभरातील साडे तीन हजार खेळाडू आणि त्यांचे संघ व्यवस्थापक विद्यापीठात दाखल झाले आहेत.
गुरुवारी, सकाळी साडेदहा वाजता विद्यापीठात राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या राहणार आहेत. याप्रसंगी विद्यापीठाचे प्रभारी प्र कुलगुरू डॉ. विकास कदम, कुलसचिव डॉ. विकास घुटे, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. सुरेश पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पहिल्यांदाच राज्यपाल कार्यालय यांच्यामार्फत राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा महोत्सवामध्ये राज्यातील 20 विद्यापिठांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. बुधवारी विद्यार्थी सोलापुरात दाखल झाले आहेत. विद्यापीठ प्रशासनाकडून या खेळाडू विद्यार्थ्यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
खो-खो, कबड्डी, हॉलीबॉल, हँडबॉल, बास्केटबॉल याबरोबरच ॲथलेटिक्सच्या स्पर्धा या महोत्सवात होणार आहेत. येत्या 30 डिसेंबरपर्यंत या स्पर्धा होणार असल्याचे क्रीडा संचालक डॉ. पवार यांनी सांगितले. यामुळे विद्यापीठ नगरी खेळाडूंच्या उत्साहाने गजबजलेले आहे.