सोलापूर- पर्यावरणाचा प्रश्न अतिशय गंभीर बनला असून त्यावर प्रत्येकाने दररोज विचार करण्याची गरज आहे. नागरिकांनी पर्यावरणस्नेही जीवन शैली स्वीकारण्याच्या संदर्भात पत्रकारांनी जागरूकता निर्माण केली पाहिजे, असे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केले.
बुधवारी, सोलापूर विज्ञान केंद्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामधील सामाजिकशास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभाग आणि सोलापूर विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यावरण पत्रकारिता कार्यशाळेमध्ये कुलगुरू डॉ. फडणवीस बोलत होत्या. याप्रसंगी मंचावर दैनिक सकाळ पुण्याचे सहयोगी संपादक सुनील माळी, पुणे येथील सेंटर फॉर इन्व्हरमेंट एज्युकेशनचे स्वप्निल बोराडे, पुणे येथील माहितीपट निर्मात्या शिल्पा बल्लाळ, पत्रकार विनोद कामतकर यांच्यासह सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. जी. एस. कांबळे, विज्ञान केंद्राचे समन्वयक राहुल दास, पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, डॉ. प्रभाकर कोळेकर यांची उपस्थिती होती.
कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, अनेक देशांनी पर्यावरण, पर्यटनाच्या माध्यमातून देशाचा विकास केला आहे. सिंगापूर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. आपल्याकडील प्रत्येक नागरिकाची वृत्ती यासंदर्भात बदलली पाहिजे व पर्यावरणस्नेही जीवनशैली आपण अंगीकारली पाहिजे. फ्रेंच नॅशनल पार्क येथे काय करावे, काय करू नये?असे बोर्ड लावलेले आहेत, तसे प्रत्येक ठिकाणी करायला हवे. पर्यावरणाच्या संदर्भात प्रसारमाध्यमांनी जागृती निर्माण करावी आणि एकंदरीतच पृथ्वीतलावरील जीवसृष्टीच्या रक्षणाच्या आणि संवर्धनाच्या दृष्टीने पावले टाकण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी बीजभाषण करताना माळी म्हणाले की, आपल्या देशातील जैवविविधता समजून घेणे. हवामानातील बदल लक्षात घेणे, विकास म्हणजे नेमके काय, त्याची संकल्पना समजून घेणे, नैसर्गिक साधनसंपत्तीचा कमी वापराच्या संदर्भात जागृती निर्माण करणे, यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. जगातील एकंदर जैवविविधतेपैकी 70 टक्के जैवविविधता भारतामध्ये आहे. असे असतानाही जैवविविधता माणसाच्या काही वृत्तीमुळे संकटात येत आहे, असे सांगून ते म्हणाले की, एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका दिवसात जेवढे पाणी वापरले जाते, तेवढे पाणी एका खेड्याला चार दिवस पुरु शकतो. शहरांमध्ये गरजेपेक्षा जास्त प्रमाणात पर्यावरणाचे शोषण होते आणि त्यामुळे पर्यावरणाचे प्रश्न वाढत चालल्याचे माळी यांनी स्पष्ट केले.
दुपारच्या सत्रात स्वप्निल बोरडे यांनी ‘हत्ती’ या विषयावर तयार केलेला माहितीपट दाखवून यासंदर्भात आणि एकंदरीत पर्यावरणाच्या संदर्भात कशा पद्धतीने वाटचाल करावी, त्याचे जतन कसे करावे, संवर्धन कसे करावे व माहितीपट कसे निर्माण करावेत, याची माहिती दिली. शेवटच्या सत्रात त्यांनी नर्मदा याविषयीची माहितीपट दाखवली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. कांबळे यांनी प्रस्ताविक करून सामाजिकशास्त्रे संकुलाची माहिती दिली. राहुल दास यांनी विज्ञान केंद्राच्या संदर्भात माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार अंबादास भासके यांनी मानले.