स्वेरीत ‘समर्पण ध्यान योग’ शिबीर संपन्न
पंढरपूर- ‘जो वर्तमान काळाचा विचार करतो आणि त्याप्रमाणे कृती करतो त्यालाच यश अधिक मिळत असल्याचे निष्कर्षावरून दिसून येते आणि हे यश मिळविण्यासाठी मनाची एकाग्रता आवश्यक आहे.एकाग्रता ही ध्यान साधनेतून शक्य आहे तर ध्यान साधना ही प्राणायम केल्याने सफल होते.’ असे प्रतिपादन ध्यान शिबिराचे प्रशिक्षक आशिष कलवार यांनी केले.
स्वेरीमध्ये प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी, प्रथम वर्ष पदवी फार्मसी आणि प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकीतील विद्यार्थ्यासाठी अभ्यास करताना ‘एकाग्रता कशी आणायची’ यावर एकदिवसीय ‘समर्पण ध्यानयोग’ या विषयाच्या माध्यमातून आयोजिलेल्या शिबिरात प्रशिक्षक आशिष कलवार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. प्रारंभी कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. ओंकार महाजन यांनी या शिबिराची सविस्तर माहिती दिली. पुढे बोलताना प्रशिक्षक आशिष कलवार म्हणाले की, ‘पूर्वी आलेल्या अपयशाकडे दुर्लक्ष करून पुढील कार्यात एकाग्रता वाढवली पाहिजे यासाठी आपल्याला ‘अपयश’ आणि ‘अपमान’ पचविता आले पाहिजे. या महत्वाच्या दोन कारणावर मत केल्यामुळे विश्वात अनेक जण भविष्यात यशस्वी झालेले आहेत. यासाठी भूतकाळाचा अनुभव पाठीशी घेवून वर्तमान काळावर लक्ष केंद्रित करा मग पहा भविष्यकाळ किती सुंदर आणि अवर्णनीय असेल. यासाठी आपण असे कार्य करा की आपल्या कार्याने आणि कर्तृत्वाने आपल्यावर टीका करणाऱ्यांची तोंडे आपोआप बंद झाली पाहिजे. यासाठी सर्वप्रथम आपले आभामंडल वाढविणे गरजेचे आहे. यासाठी सभोवताली असणारे वातावरण, संगत याचा देखील यावर परिणाम होत असतो. यासाठी नेहमी सकारात्मक विचार करावा. आत्मविश्वास वाढवण्यासाठी एका वेळी एकच काम करा आणि पूर्णत्वास न्या. तसेच दुसऱ्यामध्ये बदल घडविण्यापेक्षा स्वतः मध्ये बदल घडवले तर एकाग्रता वाढीस लागते. मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी साधना व प्राणायाम अत्यंत गरजेचे आहेत. कामात कोणताही ताण न येण्यासाठी नेहमी प्राणायाम करावे. नियमितच्या आसनांमुळे आत्मविश्वास भक्कम होतो. भीती व राग येण्याचे प्रमाण कमी होते. स्टेज डेअरिंगमध्ये वाढ होवून आपल्यातील कलागुण बाहेर येवू लागतात. अशा अनेक बाबी आपल्यावरच अवलंबून आहे. प्राणायामामुळे एकाग्रता वाढते आणि एकाग्रता वाढल्यास आपण वर्तमान काळातच राहू शकतो त्यामुळे एनर्जी वाढते आणि यश मिळते. यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारले त्याला प्रशिक्षकांनी योग्य आणि समर्पक उत्तरे दिली. यावेळी वैशाली पाटील, मेघा आहिरे, धर्मराज देशमुख, सयाजी श्रीराम, विक्रम सातव यांच्यासह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या व्यवस्थापन परिषदेचेपरीषदेचे सदस्य, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, स्वेरीचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे,विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमित गंगवाल, अधिष्ठाता, प्राध्यापकवर्ग तसेच प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी, प्रथम वर्ष पदवी फार्मसी आणि प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी मधील विद्यार्थी उपस्थित होते. तसेच येत्या २५ सप्टेंबर रोजी पंढरपूर मार्केट यार्ड समोर चंद्रभागा मैदानावर मुंबईच्या योगप्रभा भारती (सेवा संस्था) यांच्यातर्फे समर्पण ध्यान योग दर्शन मोफत शिबिराचे संध्याकाळी ५ ते ८.३० या वेळेत आयोजन केले असून अधिक माहितीसाठी प्रशिक्षक आशिष कलवार (मोबा. ७८८८०४९०९२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. सुत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर आभार समन्वयक प्रा. ओंकार महाजन यांनी मानले.