ग्लोबल कार्निवल : ४५ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन
सोलापूर : महात्मा गांधीजींच्या शतकोत्तर स्वर्ण महोत्सवी जयंती वर्षाचे औचित्य साधून कै. ब. ई. चनशेट्टी गुरुजी प्रतिष्ठान संचलित महात्मा गांधी ग्लोबल व्हिलेज, बोरामणी, जि. सोलापूरच्या वतीने ग्लोबल कार्निवल 2020 चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रा. अनिकेत चनशेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महात्मा गांधीजींच्या स्वप्नातला भारत वसला आहे तो खेड्यात. खेडी स्वावलंबी, स्वयंपूर्ण व सक्षम झाली तरच देशाचा विकास होईल, यासाठी त्यांनी ग्रामोद्धाराची संकल्पना मांडली होती. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागातील शेती, उद्योग, शिक्षण (विज्ञान-तंत्रज्ञान) कला, क्रीडा व सांस्कृतिक जीवनमान उंचावण्यासाठी दिनांक ३१ डिसेंबर २०१९ ते २ जानेवारी २०२० या कालावधीत ग्लोबल कार्निवल चे आयोजन करण्यात आले आहे.याच दरम्यान जिल्हा परिषद शिक्षण विभाग, सोलापूरच्या वतीने तीन दिवसीय ४५ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन सुद्धा ग्लोबल व्हिलेज पब्लिक स्कूल व जुनिअर कॉलेज, बोरामणी येथे होणार आहे.
दि. ३१ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी १०.०० वाजता या ग्लोबल कार्निवल चे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते आणि अक्कलकोट तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार मा. सचिन कल्याणशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा क्रीडाधिकारी नितिन तारळकर, जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रकाश वायचळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सौ. सुलभा वटारे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सजय राठोड, अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज च्या अधिष्ठाता डॉ. सौ. माधवी रायते, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. उमाकांत की सचिवा श्रीमती. संगिता शहा, शिक्षण विस्तार अधिकारी विज्ञान पर्यवेक्षक अशोक भांजे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या कार्निव्हलमध्ये विद्यार्थ्यांसाठी विज्ञान तंत्रज्ञान प्रदर्शन, आरोग्याची जाणीव व्हावी यासाठी शरीर रचना प्रदर्शन, आधुनिकतेची कास धरून शेती व शेतीपूरक उद्योगधंदयांसाठी कृषी प्रदर्शन, महिला सक्षमीकरणासाठी महिला बचत गट वस्तू विक्री व प्रदर्शन, विविध क्रीडा स्पर्धा. सांस्कतिक विकासासाठी बालनाट्य, लोककला / लोकनृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.