सोलापूर- महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना खूप काही शिकायला मिळते. विद्यार्थ्यांच्या नेतृत्व विकासाला वाव मिळतो. व्यक्तिमत्त्वाचा विकासही यामुळे होतो, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केले.
सोमवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून आयोजित निवासी विशेष श्रमसंस्कार साखळी शिबिराचे उद्घाटन डॉ. फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विकास कदम आणि कुलसचिव डॉ. विकास घुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. गुणवंत सरवदे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या साखळी शिबिराची माहिती दिली. या माध्यमातून श्रमदान, प्रबोधनपर व्याख्यान तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, राष्ट्रीय सेवा योजना विभागामुळे एकत्र येण्याचे, एकजूट व्हायचे बळ मिळते. यामुळे आपण समाजात एकत्र येऊन काम करतो. स्वयंशिस्त लागते. ‘एनएसएस’मुळे आपण अनेक गोष्टींचा त्याग करायला शिकतो. स्वतःची कामे स्वतः करतो. यामुळे विद्यार्थी जीवनात व्यक्तिमत्व विकास होण्यास चांगली संधी मिळते. वास्तविक आज समाजामध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे, मात्र ही चिंतेची बाब आहे. आपल्या आई-वडिलांचा सांभाळ आपण जर करू शकत नसेल, तर ही खूप मोठी दुर्दैवी गोष्ट म्हणावी लागेल. त्यामुळे आजच्या युवक-युवतींनी याविषयी सजग राहावे. तसेच ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठीही आपण प्रयत्न करावे. वृक्षारोपण यासाठीही विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे. या शिबिरामध्ये सर्वांनी चांगले योगदान देऊन उत्कृष्टसेवा देण्याचा सल्लाही कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी यावेळी दिला.
या कार्यक्रमास जिल्हा समन्वयक डॉ. वीरभद्र दंडे, विभागीय समन्वयक डॉ. जवाहर मोरे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डी. एस. नारायणकर यांनी केले तर आभार डॉ. दंडे यांनी मानले.
या शिबिरात बुर्ला महिला महाविद्यालय, शिवदारे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वालचंद कला व शास्त्र महाविद्यालय, छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय, वसुंधरा, यु एस महिला महाविद्यालय, वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्स, कॉलेज ऑफ फार्मसी, एन बी नवले सिंहगड कॉलेज, संगमेश्वर कॉलेज, संगमेश्वर रात्र महाविद्यालय, ए जी पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स आणि विद्यापीठ विभागातील विद्यार्थी सहभागी होत आहेत.