सोलापूर, दि. 8- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शेतक-यांची बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न करा. अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी काल सायंकाळनंतर लांबोटी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक, मोहोळ येथील भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, आयडीबीआय बँकेच्या शाखेस भेट दिली. या भेटीत त्यांनी शेतकरी कर्जमुक्ती संदर्भात बँकांनी केलेल्या तयारीची माहिती घेतली. कर्जमुक्ती योजना सुरळीतपणे राबविण्यासाठी कोणत्या तांत्रिक अडचणी येऊ शकतात, त्यावर काय उपाययोजना करायला हवी याबाबत बँकेचे व्यवस्थापक आणि कर्मचारी यांच्याशी चर्चा केली. यावेळी तहसिलदार जीवन बनसोडे, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, अग्रणी बँकेचे अधिकारी अनुराग खंडागळे उपस्थित होते.
लांबोटी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेत व्यवस्थापक यू.के. बागेवाडीकर यांच्याकडून दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्जदारांची यादी आणि त्यांचे आधारकार्ड क्रमांक खाते क्रमांकाशी संलग्न आहे का याबाबत माहिती घेतली.
त्यानंतर डॉ. भोसले यांनी मोहोळ येथील स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि आयडीबीआय बँकेच्या शाखांना भेट दिली. स्टेट बँकेचे व्यवस्थापक सचिन कसबे, बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक अविनाश मेकेन्ना, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक लक्ष्मीकांत कांबळे आणि आयडीबीआयचे व्यवस्थापक मनोज दरोडे यांनी माहिती दिली.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिलेल्या सूचना
* बँकांनी आधारकार्ड खाते क्रमांकाशी संलग्न न केलेल्या शेतक-यांची यादी मराठी भाषेत तयार करावी
* ही यादी बँकेच्या नोटीस बोर्डवर तसेच ग्रामपंचायतीमध्ये प्रदर्शित करावी
* संबंधित यादीची प्रत तहसिलदार कार्यालय आणि सहनिबंधक कार्यालयास द्यावी
* बँकांनी आधारकार्ड खाते क्रमांकाशी संलग्न नसलेल्या शेतक-यांशी संपर्क साधावा