सोलापूर, दि.10-पत्रकारांनी सतत अन्यायग्रस्तांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे आणि त्यांचे प्रश्न मांडणारी पत्रकारीता केली पाहिजे. राजकीय पत्रकारिता समजण्यासाठी आपल्या देशातील समाजकारण, अर्थकारण आणि संस्कृती नीटपणे समजून घेणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी व्यक्त केले.
शुक्रवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागात ‘टेलिव्हीजन पत्रकारिता नवे प्रवाह’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत ज्येष्ठ पत्रकार चोरमारे हे बोलत होते. प्रारंभी कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, साम वृत्तवाहिनीच्या पत्रकार सोनाली शिंदे, पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांची उपस्थिती होती.
चोरमारे यांनी टेलिव्हिजन वरील राजकीय चर्चा या विषयावर मते मांडताना सांगितले की, या चर्चा एखाद्या नाटकाच्या प्रयोगासारख्या असतात. यात टीआरपी वाढविणे हा मूळ उद्देश असतो. त्यामुळे अनेकदा गंभीर विषय बाजूला राहतात आणि नको त्या मुद्द्यांवर चर्चा होत राहते. या सत्राच्या अध्यक्षस्थानी दैनिक सकाळचे सहयोगी संपादक अभय दिवाणजी होते. ते म्हणाले की, पत्रकारांनी विकासाला प्राधान्य देणारी पत्रकारीता करायला हवी. आजच्या काळामध्ये सोशल मीडियामुळे अनेक चुकीच्या गोष्टी समाजासमोर येत आहेत. अशा काळात मुद्रित माध्यमे लोकांचा विश्वास टिकवून आहेत.
दुसऱ्या सत्रात तरुण भारतचे निवासी संपादक विजयकुमार पिसे यांनी टीव्हीवरची चर्चा ही भरकटलेली असते आणि अँकरिंग करताना पक्षपातीपणा नसायला हवा अशी भूमिका मांडली. या सत्रामध्ये बोलताना पुण्यनगरीचे वृत्तसंपादक रघुवीर शिराळकर म्हणाले की, आजच्या काळात पत्रकारितेचे संदर्भ बदलले आहेत. बेधडक बातम्या देत असताना त्या बातमीचे खरेपण पत्रकारांनी तपासून पाहिले पाहिजे आणि विश्वासार्हता जपायला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रात साम टीव्हीच्या पत्रकार सोनाली शिंदे यांनी टेलिव्हिजनसाठी राजकीय पत्रकारिता कशी करावी, यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. त्या म्हणाल्या की, महिला पत्रकारांनी मागील विधानसभा निवडणुकीच्या कालखंडामध्ये चांगल्या राजकीय पत्रकारितेचे धडे इतरांना दिले आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अंबादास भासके यांनी केले तर डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी आभार मानले.