सोलापूर : आषाढी वारी मध्ये तुम्ही काय केलं? असा सवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना बजावलेल्या नोटीसीमध्ये केला आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आषाढी वारीमध्ये जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्या कामकाजाचा नुकताच आढावा घेतला. याबद्दल माहिती देताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रत्येक विभागांनी चांगली कामगिरी केल्याचा त्यांनी उल्लेख केला मात्र माध्यमिक शिक्षण विभाग आषाढी वारी मध्ये कुठेच दिसला नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना नोटीस बजावल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आषाढी वारी मध्ये माध्यमिक शिक्षण विभागावरही जबाबदारी देण्यात आली होती. पण ही जबाबदारी माध्यमिक शिक्षण विभागाने पार पाडली नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षण अधिकारी जगताप यांना नोटीस बजावल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या नोटेशन वर माध्यमिक शिक्षणाधिकारी जगताप काय उत्तर देतात त्यावर त्यांच्याविरुद्ध शिक्षण आयुक्तांकडे तक्रार केली जाणार असल्याचे सीईओ जंगम यांनी स्पष्ट केले.
शालेय शिक्षण विभागाने आषाढी वारीमध्ये साक्षरता दिंडी काढली होती. या दिंडीमध्ये सोलापूरचे शिक्षणाधिकारी कोठेच दिसले नसल्याचे दिसून आले आहे. साक्षरता दिंडीमध्ये प्रचार आणि प्रसिद्धी करण्यातही शिक्षण विभागाला अपयश आले आहे. दिंडीचा समारोप झाला तेव्हा योजना शिक्षण अधिकारी सुलभा वठारे यांचेही उपस्थिती दिसून आलेली नाही. आमच्यावर दुसरी जबाबदारी होती असे स्पष्टीकरण त्यांनी दिले असले तरी त्यांनी नेमके काय केले हे अद्याप समोर आले नाही. माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनीही वारी काळात कोर्ट प्रकरणात गुंतलो असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. पण आठवडाभर कोर्ट प्रकरणात ते गुंतले होते काय? या काळात दुपारच्या सत्रात ते माध्यमिक शिक्षण विभागात दिसले होते. त्यावेळी ते काय करत होते? असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यांनी दिलेल्या लेखी खुलाशानंतर पुढील कार्यवाही होणार असल्याचे सांगण्यात आले.
माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे वेगवेगळ्या कारणाने नेहमीच चर्चेत राहिले आहेत. कार्यालयात उपस्थित न राहणे, कोर्ट कामात बिझी असल्याचे सांगणे यामुळे माध्यमिक शिक्षण विभागात येणाऱ्यांची कामेच होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. कामे घेऊन आलेल्यांना योग्य मार्गदर्शन न करता त्यांच्याशी वाद घालणं, कायदेशीर होणारे कामे टाळणे अशा तक्रारी वाढल्या आहेत. सहकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांना कामकाज करताना विश्वासात न घेता कामकाज चालवणे यामुळे अनेक अधिकारी काम सोडून जाताना दिसून येत आहेत. त्यामुळे त्यांच्या कामकाज पद्धतीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे. आता सीईओ ॲक्शन मोडवर आल्यामुळे पुन्हा एकदा माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप चर्चेत आले आहेत.