येस न्युज नेटवर्क : संपूर्ण जगाचं लक्ष लागून असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरू असून, आतापर्यंतच्या निकालांमधून रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पुढील अध्यक्ष असतील हे स्पष्ट झाले आहे. अटीतटीची लढत असल्याचे सांगण्यात येत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आज मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच जोरदार मुसंडी मारत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यावर विजयी आघाडी घेतली. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे ४७ वे राष्ट्रपती म्हणून जानेवारी महिन्यात शपथ घेतील.
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी होण्यासाठी ५३८ इलेक्टोरल मतांपैकी २७० मतं मिळवणं आवश्यक असतं. दरम्यान आतापर्यंत ४८१ निकाल हाती आले असून, त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना २६७ इलेक्टोरल मतं मिळाली आहेत. तर कमला हॅरिस यांना २१४ इलेक्टोरल मतं मिळाली आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प हे विस्कॉसिन, मिशिगन, अॅरिझोना, नेवाडा आणि अलास्का या राज्यांमध्ये आघाडीवर असल्याने ते तीनशेपार मजल मारतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.