हिंदू नेत्या माधवी लता : विश्व हिंदू परिषदेतर्फे लोकजागर अभियान
सोलापूर : चुकीच्या व्यक्तीला मतदान केल्यामुळे पुढील पाच वर्षे संपूर्ण समाजाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे हिंदुस्थान देशाच्या शत्रूपासून मुक्त करण्यासाठी देशप्रेमी उमेदवारांना विधानसभेत पाठवा, असे प्रतिपादन हैदराबाद येथील हिंदू नेत्या माधवी लता यांनी केले. विश्व हिंदू परिषदेतर्फे आयोजित लोकजागर अभियानांतर्गत रविवारी सायंकाळी माधव नगर पटांगण येथे माधवी लता यांचे जाहीर व्याख्यान झाले.
यावेळी व्यासपीठावर विश्व हिंदू परिषदेचे प्रांत धर्माचार्य मार्गदर्शन मंडळ सदस्य ह.भ.प. लक्ष्मण महाराज चव्हाण, विश्व हिंदू परिषदेचे विभाग संपर्कप्रमुख पुरुषोत्तम उडता, विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे, खजिनदार हितेश माधु, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री संजय जमादार,
जिल्हाध्यक्ष ह.भ.प. अभिमन्यू महाराज डोंगरे, बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक नागेश बंडी, धर्मप्रसार प्रमुख रवी बोल्ली, दुर्गा वाहिनीच्या संयोजिका नंदिनी अक्कल उपस्थित होत्या. प्रारंभी भारतमाता प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलनाने व्याख्यानाचे उद्घाटन झाले.
विधानसभा निवडणुकीमध्ये नागरिकांनी १०० टक्के मतदान करावे, राष्ट्रभक्त उमेदवाराला पाठिंबा द्यावा याकरिता या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. मतदानाबद्दल जागृती वाढावी त्यासाठी या व्याख्यानातून प्रबोधन करण्यात आले.
माधवी लता म्हणाल्या, जय भारतमातेने आपल्याला जन्म दिला त्या भारत मातेसाठी आपण जगले पाहिजे. भारतातील धर्मनिरपेक्ष लोक पाकिस्तान आणि बांगलादेशातून होणाऱ्या घुसखोरीविरोधात कधीच बोलत नाहीत. ब्रिटिशांनंतर भारतातील ब्रिटिश विचारांच्या लोकांनी भारतावर ६० वर्षे राज्य केले. वक्फ बोर्डाच्या नावाखाली अनेक जमिनी विकल्या गेल्या. धर्मनिरपेक्षतावाद मांडणाऱ्यांनी भारताला समजून घेतले आहे का ?भारताची संस्कृती समजून घेतली आहे का ? या सर्व समस्यांवर उपाय म्हणून देशप्रेमी विचारांचे सरकार निवडून येणे गरजेचे आहे. त्याकरिता ज्ञानी, योगी व्यक्तींना निवडून देणे आवश्यक आहे. आपल्याला भारताला विश्वगुरूपदावर पोहोचवायचे आहे. त्यामुळे धोकेबाज लोकांपासून सतर्क रहा, असे आवाहनही माधवी लता यांनी यावेळी केले.
धनुष्यबाण मारतानाचा अभिनय करताच उपस्थित यांचा एकच जल्लोष
जाहीर व्याख्यानावेळी धनुष्यबाण मारण्याचा माधवी लता करत असलेला अभिनय संपूर्ण देशभरात लोकप्रिय आहे. रविवारी झालेल्या व्याख्यानावेळी सोलापूरकरांच्या आग्रहाखातर व्यासपीठावरून त्यांनी धनुष्यबाण मारतानाचा अभिनय करताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला.
पद्मशाली समाजाच्या नावातच कमळ
तेलगू भाषिक पद्मशाली विणकर समाज हा कष्टकरी आहे. आंध्र, तेलंगणातून सोलापूरसारख्या ठिकाणी येऊन त्यांनी सोलापूरचे विकासात योगदान दिले आहे. पद्मशाली समाजाच्या नावातच कमळ, आहे अशा शब्दात त्यांनी पद्मशाली समाजाचा गौरव केला.