जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने जागतिक पुस्तक दिन साजरा
सोलापूर :- ग्रंथ व पुस्तके हे माणसे घडविण्याचे काम करतात. सर्वानी ग्रंथ अथवा पुस्तके सातत्याने वाचली पाहिजेत. वाचनाने माणसे सुसंस्कृत, प्रगल्भ होत असतात. असे जिल्हा माहिती सुनिल सोनटक्के यांनी सांगितले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात आज जागतिक पुस्तक दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात होते. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी श्री सोनटक्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे प्रमोद पाटील, प्रदीप गाडे तसेच असंख्य वाचक वर्ग उपस्थित होते.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सोनटक्के म्हणाले, वाचन माणसाला समृद्ध करतेच शिवाय काय चांगले काय वाईट याची समजही वाचनातून प्राप्त होत असते. संवेदनशीलता आणि आत्मविश्वास देखील वाचनातून प्राप्त होतो. कोणत्याही व्यक्तीला यश प्राप्तीसाठी पुस्तकांचा फार मोठा फायदा होतो. ग्रंथ प्रदर्शनामुळे वाचकांना नवीन ग्रंथ, पुस्तके पहावयास मिळतात. त्यातुनच वाचनाची आवड निर्माण होते. त्याचबरोबर वाचक वर्ग वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.