सोलापूर – प्रिसिजन गप्पा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्या आहेत त्याची लगबग चालू झाली आहे. दिनांक १८ ते २० ऑक्टोबर दरम्यान प्रिसिजन गप्पांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रिसिजन गप्पांच्या तयारीचा एक भाग म्हणून दरवर्षी रंगभवन सभागृहाची स्वच्छता आणि देखभाल केली जाते. प्रिसिजनच्या प्रत्येक कार्यक्रमात स्वच्छता आणि शिस्तीला खूप महत्व दिले जाते. याचसाठी प्रिसिजनचे स्वच्छतादूत स्वतः जातीने इथली स्वच्छता, डागडुजी, रंगरंगोटी करतात. शहरातील संस्कृतिक सभागृह स्वच्छ व सुंदर राहावे ही सर्वांची जवाबदारी आहे असे समजूनच प्रिसिजन हे काम करते.
एखाद्या मंगलकार्याप्रमाणे सगळी स्वच्छता आणि सजावट प्रिसिजन गप्पांसाठी चाललेली असते. प्रिसिजनचे २५ – ३० स्वच्छतादूत कार्यक्रमाच्या आधी तीन दिवस अहोरात्र काम करून ही सगळी किमया घडवून आणतात. यासर्व कामात रंगभवन व्यवस्थानाचे ही खूप सहकार्य मिळते.
“प्रिसिजन गप्पांचं” देखणं रूप सर्व सोलापूरकरांसमोर येतं ते या अशा पडद्यामागच्या आमच्या “कलाकारां”मुळे ! सोलापूरकर रसिक प्रेक्षकांच्या स्वागतासाठी प्रिसिजन परिवार उत्सुक आहे.
गप्पांच्या आजच्या पहिल्यादिवशी प्रख्यात नाटककार, लेखक सतीश आळेकर लिखित “ठकीशी संवाद” हे प्रायोगिक नाटक सादर होईल. नाटकानंतर लेखक सतीश आळेकर, दिग्दर्शक अनुपम बर्वे, कलाकार सुव्रत जोशी आणि गिरिजा ओक यांची प्रकट मुलाखत मिलिंद कुलकर्णी हे घेणार आहेत.
तरी सर्व सोलापूरकर रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, प्रिसिजनचे चेअरमन यतिन शहा यांनी केले आहे.