सोलापूर: पूर्वीच्या काळी रक्षाबंधनाचा अर्थ बहिणीने भावाला राखी बांधणे एवढाच अभिप्रेत नव्हता, त्याकाळी रक्षाहोम करून रक्षासूत्र तयार करून ते राजाला बांधले जायचे, अशा पद्धतीने रक्षाबंधन विधिवत करणाऱ्यांनी भद्राकाल वर्ज्य करावा.
राखी पौर्णिमा अर्थात बहिणीने भावाच्या हाताला राखी बांधणे. याकरिता भद्रा वर्ज्य नाही आणि राखी बांधण्यासाठी कोणत्याही वेगळ्या मुहूर्ताची आवश्यकता नाही. त्यामुळे भद्राचा विचार न करता ३० ऑगस्ट २०२३ रोजी बुधवारी नेहमी प्रमाणे राखीपौर्णिमा साजरी करावी असे आमचे मत आहे. तसेच रक्षाबंधन हा मुंज, विवाह, वास्तु प्रमाणे मंगल कार्यासारखे नसून सामाजिक व कौटुंबिक उत्सव असल्याने भद्रा असतानाच्या काळात म्हणजे दिवसभरात आपल्या सोईने केंव्हा ही करता येईल असे आमचे मत असल्याने दाते पंचांगात रक्षाबंधनाची वेळ दिलेली नाही.
ज्यांना रक्षाबंधन विधिवत् करावयाचे आहे त्यांनी खालील प्रमाणे विधी करावा व त्यासाठी भद्राकाल वर्ज्य करावा म्हणजे रात्री ९ वाजून २ मिनिटानंतर रक्षाबंधन करावे. रक्षाबंधन विधी – तांदूळ, सोने व पांढऱ्या मोहऱ्या किंवा दुर्वा, अक्षता, केशर, चंदन, मोहरी चे दाणे एकत्र करून त्यांची रेशमी कापडात पुरचुंडी बांधून त्याला रंगीत दोरा बांधून रक्षा अर्थात् राखी तयार करावी आणि ती देवघरात कलशावर ठेऊन तिची पूजा करावी. नंतर पुढील मंत्र म्हणत ती राखी बांधावी.
येन बद्धो बलीराजा दानवेन्द्रो महाबलः । तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल ।।
मात्र या शिवाय प्लास्टिक, स्पंज, इत्यादी पासून तयार केलेली बाजारात मिळणारी वेगवेगळ्या प्रकारची राखी बांधावयाची असेल तर भद्राकाळात सुध्दा असे रक्षाबंधन करता येईल. असा हा बहीण – भाऊ, मित्र, समाज बांधव यांच्यातील सामाजिक सलोखा राखणारा हा रक्षाबंधन उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करावा.