सोलापूर – मानवाधिकार तुम्हाला जन्मजात मिळाला आहे. त्यात सुधारणा होण्याची गरज आहे. महात्मा बसवेश्वर महाराज हे बाराव्या शतकातील समतेचे महानायक होते. संत तुकारामांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहु महाराज, महात्मा फुले या सर्व क्रांतिकारांचा इतिहास आपण पाहिला तर यांच्या आयुष्यात त्यांनी खूप मोठा संघर्ष केला. त्यांचा आज आदर्श घेण्याची गरज असल्याचे मत नॅशनल प्रेसिडेंट सेंट्रल ह्युमन राईट्स संघटनेचे डॉ. कुमार लोंढे यांनी व्यक्त केले. शनिवारी, डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात सेंट्रल ह्युमन राईट्स संघटन, दिल्ली आयोजित राज्यस्तरीय मानव अधिकार परिषद व पदाधिकारी निवड समारंभ पार पडला. यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी कार्यक्रमाचे उद्घाटन समाज कल्याण उपायुक्त नागेश चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. व्ही. एम. शासकीय मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. ऋत्विक जयकर, माजी नगरसेवक महेश थोबडे, सुधीर थोबडे, डॉ. अॅड. एम.जी. तांबोळी, अॅड. धनंजय बाबर, प्रफुल्ल बाबर, डॉ. कीर्तीपाल गायकवाड, गोविंद कोरे, रणजित सातपुते, युवा उद्योजक प्रथमेश व निखिल थोबडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या पदाधिकारी निवड समारंभात दिल्ली आयोजित राष्ट्रीय यूथ सेलच्या उपाध्यक्षपदी उद्योजक संकेत थोबडे यांची निवड करण्यात आली. तसेच राज्य संघटकपदी श्रेयस पाटील व जिल्हाध्यक्षपदी लक्ष्मीकांत पवार यांची निवड करण्यात आली. संकेत थोबडे म्हणाले, जगातील सर्व देशातील प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्याने जगण्याचा अधिकार दिला आहे.
सोलापूरमध्ये गेल्या १५ ते २० वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा किंवा शासकीय रुग्णालय यांची परिस्थिती फारशी चांगली नाही. दैनंदिन आयुष्य जगताना सर्वसामान्यांना शासनाच्या नव्या योजना लवकर कळतच नाही. यासाठीच ह्यूमन राइट्सच्या माध्यमातून यापुढे काम करणार असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केले.