छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास मी कसा बदलू शकतो. त्यांचा खोटा आणि घाणेरडा इतिहास मी सांगावा, अशी काहीजणांची इच्छा आहे. पण मी खरा इतिहास सांगण्यापासून कधी मागे हटणार नाही. उलट दहा पावले पुढे जाऊन इतिहास सांगेन, असा निर्धार इतिहास अभ्यासक आणि संशोधक इंद्रजित सावंत यांनी व्यक्त केला. इंद्रजित सावंत यांना फोनवरुन एका व्यक्तीने धमकी दिल्याचा प्रकार समोर आला होता. या पार्श्वभूमीवर इंद्रजित सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली.
मला साधारण रात्री 12 वाजता धमकीचा फोन आला. फोनवरील व्यक्ती शिव्या घालून जातीवाचक बोलत होती. हा महाराष्ट्र पेशव्यांचा होत आहे का? अशी खंत वाटते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मी एका विशिष्ट समाजाचा आहे असा कधी उल्लेख केला नाही. फोनवरील व्यक्तीने शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. राज्याच्या गृहमंत्रालयाकडून यावर कारवाई करण्यात यावी. मला धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा व्यक्तीवर कारवाई करतील. संबधित व्यक्तीची मोठ्या नेत्यांबरोबर उठबस आहे. त्यांनी यावर कारवाई करून आपण सर्व समाजाचे आहोत हा संदेश द्यावा, असे इंद्रजित सावंत यांनी म्हटले.
अशा पद्धतीच्या धमकीला भीक घालत नाही. माझे संरक्षण करण्यास मी समर्थ आहे, माझे नातेवाईक, सहकारी सक्षम आहेत फोनवरील व्यक्तीने मला घरात घुसून मारण्याची धमकी दिली. मात्र, मराठ्यांचा इतिहास काय आहे ते त्यांना माहिती आहे. मी खरा इतिहास सांगण्यापासून कधी मागे हटणार नाही, उलट दहा पावले पुढे जाऊन इतिहास सांगेन, असे इंद्रजित सावंत यांनी म्हटले.