सोलापूरकर नागरिकांनी पुढील चार दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन
सोलापूर दि.21 (जिमाका) भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत विविध व नाविन्यपुर्ण उपक्रमाचे आयोजन पर्यटन विभागामार्फत करण्यात येत आहे. सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने 21 ते 25 फेब्रुवारी 2024 कालावधीत शिवछत्रपती रंगभवन, सिटी एग्झिबीशन सेंटर, सोलापूर येथे महासंस्कृती महोत्सवाचे करण्यात आले आहे.

पाच दिवस चालणाऱ्या महासंस्कृती महोत्सवाचे रंगभवन येथे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी उद्घाटन केले. या अंतर्गत पुढील चार दिवस सोलापूरकर नागरिकांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा भरभरून लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

राज्यातील विविध विभागातील संस्कृतीचे आदान- प्रदान, स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, स्वातंत्र्यलढ्यातील ज्ञात- अज्ञात लढवय्यांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा पाच दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 21 फेब्रुवारी रोजी सुंदर माझी शाळा हा कवितेची सांगीतीक मैफिल व मधुरव -बोरु ते ब्लॉग हा मराठी भाषेचा रंजक इतिहास सांगणाऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी मोनिकासिंग ठाकूर यांच्या हस्ते झाले आहे. आजच्या सांगितिक मैफिलीने सर्व रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. तर मराठी भाषेचा रंजक इतिहास मधुरव- बोरु ते ब्लॉग यातून सांगण्यात आला. या कार्यक्रमांना सोलापूरकर रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.

आज दि. 22 फेब्रुवारी रोजी स्थानिक कलाकारांचा पारंपरिक लोककलांचा कार्यक्रम होणार आहे. दि.23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.00 ते रात्री 10.00 पर्यंत पंडित भिमन्ना जाधव, व्यंकटेश भिमन्ना जाधव व कलाश्री जाधव यांचा सुंद्रीवादन कार्यक्रम तसेच महाराष्ट्राची लोकधारा नृत्यविष्कार, प्रदर्शन दालने येथे सकाळी 10.00 ते रात्री 8.00 पर्यंत कार्यक्रम होणार आहे.दि. 24 फेब्रुवारी रोजी “वंदे मातरम” देशभक्तीपर गायन कार्यक्रम होईल.दिनांक 25 फेब्रुवारी रोजी “गुढी महाराष्ट्राची” हा नृत्य नाट्य कार्यक्रम होणार आहे.
महासंस्कृती महोत्सवाचे कार्यक्रम दोन टप्प्यात होत आहेत. दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.00 ते रात्री 06.00 वाजेपर्यंत कार्यक्रम होणार आहे. तसेच सिटी एग्झिबीशन सेंटर, सोलापूर येथे दि 23 ते 25 फेब्रुवारी पर्यंत कार्यक्रम होणार आहेत. त्याचबरोबर शिवकालीन शस्त्रे, शिल्पकला, जैवविविधता तसेच वस्त्र दालन असे विविध दालन पहायला मिळणार आहे. त्याचबरोबर सुंदर माझी शाळा हा कार्यक्रम दि. 22 फेब्रुवारी रोजी सदाशिवराव माने विद्यालय, अकलुज येथे तर 23 फेब्रुवारी रोजी श्री. कमलाभवानी मंदीर पार्किंग स्थळ, श्री देवीचा माळ, करमाळा या ठिकाणी देखील होणार आहे.