मुंबई – उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणामुळे अचानक राजीनामा दिला आहे. या घटनाक्रमामुळे देशभरात उपराष्ट्रपती पदाच्या निवडीसाठी चर्चांना उधाण आले आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातील एक प्रमुख नेत्याचे नाव उपराष्ट्रपती म्हणून चर्चेत आहे, राजस्थानचे राज्यपाल आणि महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणावरून आपला राजीनामा दिला आहे. संसदेत पावसाळी अधिवेशन चालू असतानाच हा राजीनामा समोर आला, आणि यामुळे उपराष्ट्रपती पदावर पुढे कोण येणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आल्याने आता नवीन उपराष्ट्रपती कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून यासाठी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली आहे.
बागडेंच्या नावाची चर्चा
उपराष्ट्रपती पदाच्या चर्चेत सध्या एक महाराष्ट्रातील नाव पुढे येत आहे, आणि ते म्हणजे हरिभाऊ बागडे. महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राजस्थानचे राज्यपाल असलेल्या हरिभाऊ बागडेंच्या नावाची उपराष्ट्रपती म्हणून निवड होऊ शकते, असे बोलले जात आहे. हरिभाऊ बागडे हे फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा आमदार राहिले आहेत. त्यांना लोक नाना म्हणून ओळखतात, आणि त्यांचा जीवनप्रवास एक प्रेरणादायी आहे. शेतकरी कुटुंबातून आलेले हरिभाऊ यांनी लहानपणी घराघरात जाऊन वृत्तपत्र विकले होते. शेतकरी कुटुंबात वाढलेल्या हरिभाऊंना शेती प्रती विशेष आकर्षण आहे, आणि त्यांचं नामकरण “कृषी योग” असे करण्यात आले आहे.
बागडेंचा राजकीय प्रवास कसा ?
फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील चित्तेपिंपळगाव येथील एका सामान्य कुटुंबात 17 ऑगस्ट 1944 रोजी जन्मलेले हरिभाऊ बागडे यांचे राजकारणातील प्रवासाची सुरूवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून झाली. संघटनात्मक काम आणि नेतृत्व कौशल्याच्या जोरावर त्यांनी राजकारणात आपली ठोस ओळख निर्माण केली.1985 मध्ये पहिल्यांदा आमदारकी लढवून हरिभाऊ बागडे विजयी झाले आणि त्यानंतर चार वेळा फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. 1995-1999 दरम्यान, मनोहर जोशी यांची मुख्यमंत्री असताना, त्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय मध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले.1999 आणि 2000 या वर्षांत फुलंब्री तालुका स्थापनेसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. गोपीनाथराव मुंडे यांच्या मदतीने फुलंब्रीला तालुक्याचा दर्जा मिळवून दिला आणि शासकीय कार्यालयांची सुरुवात केली.2004 आणि 2009 मध्ये, काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांच्याकडून पराभव होऊन देखील, 2014 मध्ये मोदी लाटेच्या मदतीने ते पुन्हा फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडून आले. 2014 मध्ये सत्तांतर झाल्यानंतर, फडणवीस सरकार मध्ये विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.विधानसभेचे सर्वोच्च पद पाच वर्ष सांभाळल्यानंतर, 2019 मध्ये डॉ. कल्याण काळे यांचा पराभव करून हरिभाऊ बागडे यांनी फुलंब्री मतदारसंघात पुन्हा भाजपचे वर्चस्व कायम ठेवले.
पडतीच्या काळातही भाजपसोबत एकनिष्ठ राहिल्यामुळे, त्यांना राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले. 40 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचा वर्तमान काळ त्यांचा एका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यापासून राज्यपाल होण्याचा उत्तम उदाहरण ठरला आहे.