“भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र विधानसभा सार्वजनिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर झाला. त्यानुसार संपूर्ण राज्यासह सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान झाले तर दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. दिनांक 15 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर 2024 या कालावधीत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जिल्ह्यात अत्यंत निर्भीड व शांततामय वातावरणात पार पडली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या कुशल नेतृत्वाखाली सर्व 11 विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हास्तरीय नोडल अधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ही प्रक्रिया यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली, ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात जवळपास 18 हजार अधिकारी कर्मचारी यांनी आपले योगदान देऊन लोकशाहीचा हा उत्सव थाटात पार पाडला.”
निवडणूक आयोगाने अधिसूचना जाहीर केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने 24 तास, 48 तास व 72 तासात जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील सर्व राजकीय होर्डिंग पोस्टर बॅनर्स हाटवले. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी आदर्श आचारसंहिता कक्ष प्रमुख म्हणून संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम केले. जिल्हास्तरीय सर्व नोडल अधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांच्या अधिनस्त सर्व अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण अत्यंत चांगले देण्यात आले, यासाठी उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी विशेष प्रयत्न केले.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व निवडणूक यंत्रणा अत्यंत दक्ष राहून कामकाज करत होते. मतदार जनजागृती करण्यासाठी स्वीप अंतर्गत संपूर्ण जिल्हाभरात अत्यंत मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम घेण्यात आले यासाठी स्वीप नोडल अधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे यांनी उत्कृष्ट नियोजन करून ज्या ठिकाणी लोकसभा निवडणुकांमध्ये कमी मतदान झालेले आहे अशा ठिकाणीही मतदार जागृती मोहीम राबवली. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जनजागृती मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले. संपूर्ण जिल्हाभरात अत्यंत चोखपणे मतदार जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आल्यामुळे सन 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये 64.59 टक्के मतदान झालेले होते तर यावर्षी 20 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्ह्यात 67.72% मतदान झाले मतदानाच्या एकूण टक्केवारी जवळपास तीन टक्के वाढलेली दिसून आली.
विधानसभेला लोकसभा निवडणूक 2024 पेक्षा अधिक मतदान केंद्र ची संख्या झाली. विधानसभेला एकूण 11 विधानसभा मतदारसंघात 3738 मतदान केंद्रे होती. या सर्व मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार किमान पायाभूत सोयीसुविधाचे निर्मिती केलेली होती. मतदाराला मतदान केंद्रावर येऊन सहज मतदान करता येईल या पद्धतीने मतदान केंद्राची निवड करण्यात आलेली होती तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी आवश्यक सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या होत्या. एकूण मतदान केंद्राच्या जवळपास 60 टक्के म्हणजेच 2305 मतदान केंद्रावर वेब कास्टिंग ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. या सुविधेमुळे संबंधित मतदान केंद्रावर कशा पद्धतीने मतदान केंद्राध्यक्ष व केंद्र अधिकारी मतदानाची प्रक्रिया राबवत आहेत याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात जिल्हाधिकारी स्वतः पहात होते व आवश्यक त्या ठिकाणी निर्देश देत होते.
सी-व्हिजील कक्षात निवडणुकीच्या अनुषंगाने आलेल्या तक्रारीवर कक्षाच्या वतीने वेळेत तक्रारी संबंधितांपर्यंत पोहोचवून त्याचा निपटारा करण्यात आला. या कक्षाचे नोडल अधिकारी आशिष लोकरे यासाठी सातत्याने लक्ष ठेवून होते. तसेच विधानसभा स्तरावरील सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे होणारे रिपोर्टिंग मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांना कळविण्यासाठी महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी अत्यंत जबाबदारपूर्वक काम केले. तसेच जिल्हास्तरावर सर्व यंत्रणांनी विधानसभा स्तरावरील निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांच्या अधिनस्त यंत्रणांना पूरक कामकाज करून ह्या निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्यात सहकार्य केले. प्रत्येक यंत्रणेला दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडून हा लोकशाहीचा उत्सव मोठ्या थाटात साजरा होण्यास प्रत्येकाने आपल्या परीने वाटा उचलला.
प्राथमिक आरोग्य आणि भोजनाची सुविधा:-
मतमोजणी परिसरात एखादी आरोग्याची समस्या उद्भवली तर त्यावेळेस त्याच्यावर ताबडतोब प्राथमिक उपचार करण्याकरता प्राथमिक उपचार किट तसेच ॲम्बुलन्सची व्यवस्था मतमोजणी परिसरात करण्यात आली होती. परिसरात चहा, अल्पोहार आणि भोजन व्यवस्था ठेवण्यात आली होती. त्यामुळे कुठलाही प्रकारचा तणाव हा कर्मचारी अधिकारी आणि निवडणूक उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींवर आला नाही. या संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेसाठी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना ही आरोग्य व चहापाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली होती. सोलापूर मनपाच्या स्वच्छता विभागाकडून सातत्याने परिसराची स्वच्छता करण्यात येत होते.
पोलीस सुरक्षा व्यवस्था :
मतमोजणी ही शांततेत व सुरळीत पार पडावी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण सुरक्षा व्यवस्था, आग प्रतिबंधक सुविधा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. प्रत्येक मतमोजणी कक्षात, पुरेसा वीज पुरवठा व जनरेटर बॅकअप सुविधा देण्यात आली होती. मतमोजणी कक्ष आणि परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले होते. चोख सुरक्षा व्यवस्थेमध्ये मतमोजणी निर्विघ्नपणे पार पडले.
मतमोजणी केंद्रावर राखीव कर्मचाऱ्यांची नियुक्ती :
मतमोजणी कामाकरिता राखीव अधिकारी आणि कर्मचार्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच स्ट्रांग रूममधून मतमोजणी कक्षामध्ये मतदान यंत्र पोहोचविण्यासाठी कलर कोडींग केलेले कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मतदान यंत्र नेण्यात येत होते.
जिल्हा व विधानसभा निहाय माध्यम कक्षाची स्थापना:-
मतदानाच्या दिवशी जिल्हास्तरीय माध्यम कक्ष जिल्हा नियोजन भवन येथून सुरू होते तर प्रत्यक्ष मतमोजणी दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्हीआयपी सभागृह येथून जिल्हास्तरीय माध्यम कक्षाचे कामकाज सुरू होते.
अकरा विधानसभाच्या माध्यम कक्षाच्या नोडल अधिकारी यांच्याकडून माहिती घेऊन पत्रकारांना देण्यात येत होती. त्याप्रमाणेच विधानसभा स्तरावर पत्रकारांसाठी देखील अकरा मतमोजणी केंद्रावर पत्रकार कक्ष उभे करण्यात येऊन एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. या कक्षामध्ये चहा, शुद्ध पाणी आणि भोजनाची व्यवस्था ठेवण्यात आली होती. या पत्रकार कक्षामध्ये दूरचित्रवाणी, इंटरनेट सुविधा, झेरॉक्स, संगणक, प्रिंटर अशा सर्व सुविधा पत्रकारांना पुरवण्यात आल्या.
तसेच सर्व संबंधित मतदार संघातील फेरी निहाय येणारी आकडेवारी व्हाट्सअप ग्रुपवर पाठविण्याबरोबरच त्याची फेरी निहाय प्रत्यक्ष प्रत पत्रकारांना देण्यात येत होती.त्यामुळे पत्रकारांना अचूक आणि वेळेवर वार्तांकन करण्यासाठी मदत झाली.
अशा उत्कृष्ट सुविधामुळे संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया उत्तमरित्या संपन्न झाली. याबाबत पत्रकारांनी कर्मचाऱ्यांनी आणि उमेदवाराच्या प्रतिनिधी देखील समाधान व्यक्त केले. सेवा सुविधा अधिक पुरवल्या की प्रत्येकाला काम करण्याची ऊर्जा मिळते. या हेतूने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतून या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी यांना मतमोजणी दिवशी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी कर्मचारी यांना चांगल्या सुविधा देण्याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले होते. तसेच त्या सुविधा व्यवस्थितपणे दिल्या जात आहेत का नाही याची खात्री केली जात होती.
त्यामुळे 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी आठ वाजता सर्व 11 विधानसभा मतदारसंघात मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली प्रथम पोस्टल मताची मोजणी करण्यात आली त्यानंतर ईव्हीएम मशीन मधील मतांची मोजणी करून फेरीनिहाय निकाल जाहीर करण्यात येत होते. जाहीर झालेल्या निकालाची प्रत तात्काळ माध्यम कक्षा देण्यात येत होती.
जवळपास सर्व विधानसभा मतदारसंघात मतमोजणी प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊन विजयी उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक निरीक्षक यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र दिले. लोकसभा निवडणूक 2024 प्रमाणेच जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणाखाली विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत मतदान व मतमोजणी सह सर्व निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडल्यामुळे जिल्हा प्रशासनाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.