येस न्युज मराठी नेटवर्क : (गिरीश गोरे) संसर्गाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी राज्य सरकारसह विविध शहरातील पालिका प्रशासनानेही अथक प्रयत्न केले. संसर्ग नियंत्रणात आणून दररोज नव्याने वाढणारी रुग्णसंख्या मर्यादित आणली. पण गेल्या काही दिवसांत हीच संख्या पुन्हा वाढून दररोज नवे चार हजार रुग्ण राज्यातआढळून येत आहेत. त्यामुळे लॉकडाउन करून पुन्हा कडक नियम लागू करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वरिष्ठ वैद्यकीय सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाउन करण्याचे मत कुणीही व्यक्त केलेले नाही. पालिकेने तपासण्यांची तसेच टेस्टिंग व ट्रेसिंगची प्रक्रिया जलदगतीने सुरू ठेवायला हवी. तसेच लसीकरणाचे ध्येय गाठण्यावर लक्ष केंद्रित करत असताना संसर्गाचे प्रमाण कसे कमी होईल, याकडे सातत्याने लक्ष ठेवायला हवे. ज्या ठिकाणी नियमांचे पालन होत नाही, त्या ठिकाणी कडक कारवाईचा बडगा उचलण्याची गरज आहे. करोना संसर्गाचे प्रमाण नियंत्रित ठेवायचे असेल तर दिलेल्या निर्देशांचे पालन करणे गरजेचे आहे. संसर्ग योग्यप्रकारे नियंत्रणात येईल, यासाठी पुन्हा लॉकडाउन करण्याची गरज नाही, याकडेही तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.सोलापुरात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पुन्हा एकदा सर्व यंत्रणांना सतर्क करून कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेतच. लोकांनीही आता स्वयंशिस्त दाखवून काही बंधने घालून घेणे आवश्यक आहे. कोरोनाची तिसरी लाट अली तर पुन्हा सर्वच बाजारपेठ बंद कराव्या लागतील. मास्क न वापरणाऱ्यांना दंड करून दोन तास डांबून ठेवले तर बंडखोर ताळ्यावर येतील. विवाह समारंभास गर्दी करणाऱ्या लोकांवर कारवाईबरोबरच मंगल कार्यालयांवर कोठार कारवाई अपेक्षित आहे. लसीकरणाची दुसरी फेरी अधिक सक्षमपणे राबविणे आवश्यक आहे.