जिल्ह्यातील औद्योगिक संघटनांचे जाणून घेतल्या समस्या
सोलापूर : औद्योगिक प्रगती झाली तर रोजगार निर्मिती होईल. रोजगार निर्माण झाला तर बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल. यातूनच देशाची प्रगती होईल. त्यामुळे उद्योजक आणि उद्योगांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावून, त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज जिल्ह्यातील औद्योगिक संघटनांसमवेत चर्चा करून त्यांच्या समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते. नियोजन भवन येथे आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा जाधव, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते, महानगरपालिकेचे अतिरीक्त आयुक्त संदीप कारंजे, महावितरणचे अधीक्षक अभियंता एस. के. सांगळे, सोलापूर एमआयडीसी इंडस्ट्रिअल असोसिएशनचे राजू राठी, एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता, एस आर गावडे, कार्यकारी अभियंता एस एस गांधीले, भरत शहा यांच्यासह औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
उद्योजकांना आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी एक खिडकी योजना तात्काळ सुरू करण्यात येणार आहे. तसेच, एमआयडीसीचे कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याचे सांगून उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील स्थानिकांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध व्हावेत. तसेच कुशल कामगार निर्मितीसाठी प्रशिक्षण केंद्राला जागा उपलब्ध करण्यात येणार आहे. चिंचोली एमआयडीसीमध्ये इमारत तयार आहे. आयटीसाठी ही इमारत दिली जाऊ शकते. त्यातील अडथळे दूर करून त्यावर मार्ग काढावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, सोलापूरला अधिकाधिक उद्योग यावेत, तसेच सोलापूरच्या औद्योगिक प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. होटगी विमानतळावर नियमित विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक घेऊन यावर निर्णय घेतला जाईल. यावेळी दावोस परिषदेमधून महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक आणली, यासाठी ना. सामंत यांचे उद्योजकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे वाढल्याने सोलापुरात नवीन औद्योगिक क्षेत्र होणे गरजेचे आहे. उद्योजकांना उद्योग निर्मितीसाठी कोणतीही अडचण येणार नाही. तसेच जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यावेळी बैठकीत सांगितले. सुरत चेन्नई इंडस्ट्रियल कॉरिडोर असल्याने विविध ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.
सोलापूरच्या विविध औद्योगिक संघटनांनी त्यांच्या अडचणी मांडल्या. यामध्ये सोलापूरच्या वस्त्रोद्योग व विडी उद्योगासाठी महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्ये विकास केंद्राची मागणी, ट्रक टर्मिनल्स उभारणे, विना वापर पडून असणाऱ्या औद्योगिक जागांचा वापर करणे तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी सुरळीत पाणीपुरवठा करणे, औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांच्या हद्दीतील साफसफाई, औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांना जागा उपलब्ध करून देणे आदिंबाबत चर्चा झाली. महापालिका हद्दीत असलेल्या औद्योगिक क्षेत्रात सोलापूर महापालिकेने आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना ना. सामंत यांनी यावेळी केल्या.
तसेच, औद्योगिक वसाहतीमध्ये पथदिव्यांची समस्या, अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, फायर स्टेशन, सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे ट्रीटेड वॉटर, अग्निशमन केंद्राची उभारणी, सिटी बस सेवा, ग्रामपंचायत करआकारणी, स्टँप ड्युटी आणि ट्रान्सफर आदि बाबींवर चर्चा करण्यात आली.