नवी दिल्ली : केंद्रात एनडीए सरकार सत्तेवर येताच जनता दल युनायटेडचे नेते बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी सातत्याने करत होते. मात्र बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाला आज अंतिम उत्तर मिळाले आहे. या उत्तरात बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळू शकत नाही, असे म्हटलं आहे. जेडीयूचे खासदार रामप्रीत मंडल यांच्या प्रश्नाला उत्तर देताना पंकज चौधरी यांनी लेखी उत्तरात बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळू शकत नसल्याचे सांगितले.
वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी केंद्र सरकारच्या वतीने उत्तर देताना सांगितले की, बिहारला विशेष राज्याचा दर्जा देणे शक्य नाही. यासोबतच विशेष दर्जासाठी ज्या तरतुदी पूर्ण कराव्या लागतात त्या बिहारमध्ये नसल्याचे केंद्रीय राज्यमंत्री म्हणाले. विशेष म्हणजे बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत आहे. बिहारमध्ये पुन्हा एकदा ही मागणी जोर धरू लागली आहे.