मद्यविक्रीचा दररोज होणार हिशोब; हॉटेल-ढाब्यांवरही वॉच
सोलापूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता उद्यापासून (शनिवारी) लागू होणार असल्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नेमलेली ४६ भरारी पथके व जिल्ह्याच्या सीमेवर नेमलेली ५२ पथके शनिवारपासूनच जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू करतील. मतदान केंद्रे, संवदेनशील केंद्रे निश्चित झाली असून, निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यात यंदा लोकसभा निवडणुकीसाठी ३५ लाख ७८ हजार ९७२ मतदार आहेत. मतदानाची टक्केवारी वाढावी, इव्हीएमबाबतचे गैरसमज दूर व्हावेत, ज्यांना इव्हीएम वापरायला जमत नाही त्यांच्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र मोहीम राबविली आहे. आता जिल्ह्यात चार हजार ८०० कंट्रोल युनिट (मशिन) तयार असून, एकूण मतदान केंद्राच्या २५ टक्के जादा मशिन देण्यात आल्या आहेत. पण, सोलापूर जिल्ह्यात चार टक्के मशिन (१६२) कमी होत्या, त्यात चार दिवसांपूर्वी वाढ करण्यात आली आहे.
एका कंट्रोल युनिटवर ३२ मशिन बसू शकतात. मात्र, एका लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात ३८४ पेक्षा अधिक उमेदवार उतरल्यास त्या त्यावेळी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाणार आहे. तूर्तास किती उमेदवार निवडणुकीसाठी अर्ज करतील व त्यातील किती जण निवडणूक लढतील याकडे सर्व अधिकाऱ्यांचे लक्ष आहे.
दारू दुकानांचा दररोज हिशोब
राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे नांदणी, मरवडे, वाघदरी येथे सीमा तपासणी नाके तयार केले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रत्येक मद्यविक्री दुकानांमध्ये किती विक्री झाली, याची माहिती घेतली जाणार आहे. तसेच जिल्ह्याअंतर्गत व जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या संशयास्पद वाहनांची तपासणी केली जाणार असून ढाबे-हॉटेल्सवर छापेमारी होणार आहे. अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्यांवर देखील कडक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने सहा पथके व एक विशेष पथक नेमले असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिली.
भरारी पथकांसह सीमेवरील पथकांचे काम आजपासून सुरु
शनिवारी (ता. १६) लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. आता पदाधिकारी नसल्याने पदाधिकाऱ्यांची वाहने जमा करण्याचे काम यावेळी नसेल. पण, वाहनांसह इतर बाबींच्या तपासणीसाठी भरारी व सीमेवरील पथके नेमली आहेत. आजपासूनच तपासणी सुरू होईल.
– गणेश निऱ्हाळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर
२५ हजार कर्मचाऱ्यांचे मार्चअखेर प्रशिक्षण
लोकसभा निवडणुकीसाठी यंदा जिल्ह्यात तीन हजार ६०९ केंद्र असणार असून, त्यात जवळपास ३० केंद्रे संवेदनशील असतील. प्रत्येक केंद्रावर किमान चार ते पाच कर्मचारी नेमले जाणार आहेत. त्याअनुषंगाने सद्य:स्थितीत २५ हजार कर्मचाऱ्यांची माहिती संकलित केली असून त्यांचे प्रशिक्षण मार्चअखेर होणार आहे. गरज पडल्यास कर्मचाऱ्यांची संख्या आणखी वाढू शकते, असेही निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.