येस न्युज नेटवर्क : जम्मू आणि काश्मीरमध्ये १० वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीनंतर नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचं सरकार स्थापन झालं. मुख्यमंत्रिपदी ओमर अब्दुल्ला यांची वर्णी लागल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सध्या विधानसभेचं पहिलं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असून अधिवेशन सुरु झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. या अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून विविध विषयांवर सभागृहात चर्चा सुरु आहे. मात्र, असं असतानाच आज जम्मू-काश्मीर (Jammu kashmir) विधानसभेत कलम ३७० (Article 370) म्हणजे तत्कालीन विशेष राज्याचा दर्जा बहाल करण्याची मागणी करणारा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये मोठा गदारोळ पाहायला मिळाला आहे.
जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत सत्ताधारी पक्षाने विशेष राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करण्याची मागणी करणारा प्रस्ताव सभागृहात मंजूर केल्यामुळे भारतीय जनता पक्षाने सरकारवर गंभीर आरोप केला. तसेच टीकेची झोड उठवली आहे. भाजपाच्या आमदारांनी हा प्रस्ताव सभागृहात मंजूर करण्यास विरोध दर्शवला होता. मात्र, सत्ताधारी पक्षाने भारतीय जनता पक्षाचा विरोध डावलत या प्रस्तावाला मंजुरी दिली. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.