मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील घटक पक्ष एकत्र लढणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. मात्र महायुतीमध्ये भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात जागावाटपाबाबत एकमत होताना दिसत नाही आहे. केंद्रातील सत्ताधारी असलेला भाजपा अधिकाधिक जागांवर लढण्यास इच्छूक आहे, त्यामुळे महायुतीमधील जागावाटपाचं घोडं अडलं आहे. त्या पार्श्वभूमीवर आता महायुतीच्या जागावाटपावर दिल्लीत तोडगा निघण्याची शक्यता आहे. तसेच त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर हे भाजपाचे राज्यातील बडे नेते दिल्लीला रवाना झाले आहेत.
एकीकडे महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून एकमत होत नसताना महायुतीमध्येही काहीसं तसंच चित्र दिसत आहे. महायुतीमधील जागावाटपाबाबत वेगवेगळे फॉर्म्युले प्रसारमाध्यमांमधून चर्चिले जात आहेत. तसेच आपल्या विद्यमान खासदारांएवढ्या जागा तरी मिळाव्यात, यासाठी शिवसेना शिंदे गट आग्रही आहे. तर शिंदे गटाएवढ्याच जागा आपल्याला मिळाव्यात, अशी मागणी अजित पवार गटाकडून केली जात आहे. दुसरीकडे भाजपालाही लोकसभेच्या महाराष्ट्रातील ३० ते ३२ जागांवर लढायचं आहे, त्यामुळे महायुतीमध्ये जागावाटपाबाबत तिढा निर्माण झालेला आहे.