सोलापूर : श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांचा ६७ वा पुण्यतिथी महोत्सव २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान होणार असून यावेळी रथ मिरवणुकीसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सार्वजनिक ट्रस्टचे चीफ ट्रस्टी दत्तात्रय देशमुख यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. सम्राट चौकातील श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात हे कार्यक्रम होणार आहेत.
या पत्रकार परिषदेस मोहन बोड्डू, रवी गुंड, रामभाऊ कटकधोंड, सुभाष बददुरकर, वामन वाघचौरे, सम्राट राऊत, रमेश देशमुख, मंदिर व्यवस्थापक निरंजन दंतकाळे उपस्थित होते.
पुण्यतिथी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री प्रभाकर अनुसंधान या पोथीचे पारायण व श्री गुरुगीता पारायण मंदिरात करण्यात येत आहे. शनिवार दि. २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता श्री ज्योतीराम चांगभले यांच्या १०० बाल वारकरी मृदंग वादकांकडून नाद ब्रह्ममय सामुदायिक पखवाज वादनसेवेचा कार्यक्रम होणार आहे. तसेच रात्री आठ वाजता मंदिरामध्ये सालाबाद प्रमाणे उत्सवातील पालखी प्रदक्षिणेचा कार्यक्रम होईल.
रविवार दिनांक २५ फेब्रुवारी म्हणजेच माघ वद्य प्रतिपदा म्हणजेच गुरुप्रतिपदेच्या दिवशी सकाळी आठ वाजता महाराजांच्या समाधीवर मंदिराचे उपाध्ये दिगंबर विठ्ठल जोशी गुरुजी यांच्या पौरोहीत्याखाली उदय वैद्य यांच्या हस्ते संकल्पाभिषेक होऊन तर्पणविधी संपन्न होईल. तसेच सकाळी नऊ वाजता श्रीमती मीनाताई जोशी यांच्या अधिपत्याखाली श्री गुरुगीता पारायणाची समाप्ती होईल.
त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता पं. दिपक कलढोणे यांचा भजन संध्या सेवेचा कार्यक्रम होईल. प्रकाश कोथिंबीरे व दत्तात्रय कुसेकर यांच्या अधिपत्याखाली रात्री ९ ते १०.३० पर्यंत सांप्रदायिक भजन होईल, तर रात्री १०.४५ वाजता गुलालाचा कार्यक्रम होणार आहे.
सोमवार दि. २६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता पोलीस उपायुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांच्या हस्ते भाविकांना लाडू प्रसादाचे वाटप होईल.
तसेच मंगळवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरापासून भव्य रथ मिरवणूक निघणार आहे. पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांच्या हस्ते पालखीची
पूजा होऊन रथ मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. पारंपरिक मार्गावरून हा रथ मिरवणुकीने जाऊन रात्री ९ वाजता पुन्हा मंदिरात विसावणार आहे. मंदिराच्या अधिकृत युट्युब चॅनेल ‘श्री गुरु महाराज परिवार’ वर वरील सर्व कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण होणार आहे. या सर्व धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी वसंत बंडगर,
बाळकृष्ण शिंगाडे व उदय वैद्य यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस मोहन बोड्डू, रवी गुंड, रामभाऊ कटकधोंड, सुभाष बददुरकर, वामन वाघचौरे, सम्राट राऊत, रमेश देशमुख, मंदिर व्यवस्थापक निरंजन दंतकाळे उपस्थित होते.